बाणेर-पाषाण लिंक रोडसाठी चंद्रकांतदादांचा पाठपुरावा

टीडीआर, डीमार्केशनसंदर्भात उद्या महापालिकेच्या विविध विभागांची महत्वाची बैठक

पुणे :- बाणेर आणि पाषाण या दोन महत्त्वाच्या उपनगरांना जोडणाऱ्या आणि गेल्या ३३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ‘बाणेर-पाषाण लिंक रोड’चा प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे, जमीन अधिग्रहणातील टीडीआर (TDR) आणि डीमार्केशन (सीमांकन) संदर्भात आज गुरुवारी पुणे महानगरपालिकेची विविध विभागाच्या प्रमुखांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. १.२ किमी लांबीच्या या रस्त्यातील केवळ २०० मीटरचा भाग भूसंपादनाच्या अडचणींमुळे अडकला होता. यामुळे या भागातील रहिवाशांना दररोज मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. चंद्रकांतदादा पाटील यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून महापालिका आयुक्तांसोबत वारंवार बैठका घेतल्या. त्यांच्याच प्रयत्नांमुळे महापालिकेने यापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडे २५ कोटी रुपये जमा केले आहेत. या होणाऱ्या बैठकीत रस्ते, भूसंपादन, मालमत्ता आणि बांधकाम चारही विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असून, प्रलंबित २०० मीटर जागेचे डीमार्केशन आणि संबंधित जागा मालकांना द्यावयाचा टीडीआर यावर शिक्कामोर्तब होणारा अहवाल तयार करणार आहेत. हा अहवालाव जिल्हाधिकाऱ्यांसमेर सादर करण्यात येणार असून अंतिम निवाड्यानंतर भूसंपादन आणि रस्त्याच्या कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. “हा रस्ता कोथरूड मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. काम करताना स्थानिक रहिवाशांच्या तक्रारींचे निवारण करून आणि त्यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करावा,” अशी आग्रही भूमिका चंद्रकांतदादा पाटील यांनी मांडली आहे. दरम्यान, या रस्त्यामुळे बाणेर, पाषाण आणि बालेवाडी परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रवासाचा वेळही वाचणार आहे.