सांगली अर्बन बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी सभासदांना 7 % लाभांश जाहीर केला

सांगली :- सांगली अर्बन बँकेची 89 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि. 7 ऑगस्ट रोजी खरे क्लब हाऊस, धामणी रोड विश्रामबाग येथे अत्यंत उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेस गतवर्षी पेक्षा जास्त सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेपूर्वी सभासद प्रशिक्षण झाले. यावेळी प्रा. सतीश होनराव यांनी सायबर सिक्युरिटी या विषयावर सभासदांना अत्यंत विस्तृत मार्गदर्शन केले, वक्ते श्री सतीश होनराव सर यांचा परिचय संदीप कुलकर्णी यांनी करून दिला. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री. होनराव सर यांनी उत्तरे दिली.या सभेचा प्रारंभ दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाला. प्रास्ताविकामध्ये अध्यक्ष गणेश गाडगीळ म्हणाले की’ बँकेस 2024-25 या आर्थिक वर्षात रु.14 कोटी 67 लाख इतका निव्वळ नफा झाला आहे. बँकेच्या ठेवींमध्ये 96 कोटीची वाढ होऊन एकूण ठेवी रु.1277 कोटी 21 लाख इतक्या झाल्या आहेत. तसेच कर्जा मध्ये रु.72 कोटी इतकी वाढ होऊन रु.760 कोटी 72 लाख इतके कर्जांचे वाटप झाले आहे. बँकेच्या एकत्रित व्यवसायात वाढ होऊन 2000 कोटींचा टप्पा पार झाला आहे. बँकेच्या एन.पी.ए मध्ये लक्षणीय घट होऊन निव्वळ एन.पी.ए चे प्रमाण केवळ 1.22 % इतके आहे. रिझर्व बँकेच्या निकषाप्रमाणे सी.आर.ए.आर चे प्रमाण किमान 12 % आवश्यक आहे ते 14.92 % इतके झाले आहे. बँकेच्या एकूण प्रगतीमध्ये उपाध्यक्ष व सर्व सहकारी संचालक मंडळ, व्यवस्थापन मंडळ सदस्य, कर्मचारी यांची मोलाची मदत व सहकार्य मिळाले आहे. तसेच आगामी काळात शाखा विस्तार करणे आणि ग्राहकांसाठी नवीन अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त सेवा देणे शक्य होणार आहे असेही अध्यक्ष गाडगीळ यांनी सांगितले. आधुनिकतेच्या जगात सभासदांना आवश्यक त्या आधुनिक सुविधा पुरविल्या जातील असे आश्वासन गाडगीळ यांनी यावेळी दिले. सांगली शहरांमध्ये अनेक शाखा जवळजवळ आहेत. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होतो. म्हणून अशा काही जवळ असलेल्या भागात स्थलांतर करण्याचा तसेच शाखा विस्तार करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. याशिवाय नफा तोटा पत्रकाची वाटणी, लेखापरीक्षक नियुक्ती, लेखापरीक्षकांनी सुचवलेली कर्ज खाती निर्लेखित करणे आदी ठराव यावेळी मंजूर करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक यांनी विषयांचे वाचन केले. यावेळी उपस्थित सभासद यांचे तर्फे अध्यक्ष गणेश गाडगीळ, उपाध्यक्ष श्रीपाद खिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक सर्व संचालक मंडळ यांचा विशेष सत्कार करणेत आला,यावेळी सभासदांनी मनोगत व्यक्त करताना सभेचे उत्तम व नेटके नियोजन करून सभा यशस्वीपणे संपन्न झालेबदल अभिनंदन व समाधान व्यक्त केले. या सभेस उपाध्यक्ष सी. ए श्रीपाद खिरे, संचालक सर्व श्री सी. ए अनंत मानवी, संजय पाटील, श्रीकांत देशपांडे,डॉ. रवींद्र आरळी, एच.वाय पाटील, संजय धामणगावकर, शैलेंद्र तेलंग, सागर फडके, सागर घोंगडे, रणजित चव्हाण, सतीश मालू, कालिदास हरिदास, मनोज कोरडे, रवींद्र भाकरे, सौ. अश्विनी आठवले, सौ. स्वाती करंदीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक, सरव्यवस्थापक वासुदेव दिवेकर तसेच बँकेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन सचिन कुलकर्णी यांनी केले. सुहास दिवेकर यांनी पसायदान म्हटले व सभेची सांगता झाली.
