पुणे सहकारी बँकेवर सहकार खात्याकडून प्रशासक मंडळ नियुक्त

पुणे प्रतिनिधी :- पुणे सहकारी बँकेवर राज्याचे सहकार आयुक्त व निबंधकांनी अशासकीय पाच सदस्यांचे प्रशासक मंडळ नियुक्त केले असून यामध्ये पांडुरंग राऊत, अॅड. विकास रासकर, भालचंद्र कुलकर्णी, राहुल पारखे व नेहा केदारी यांचा समावेश आहे. सहकार खात्याच्या सहा. निबंधक प्रगती वाबळे यांची प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.प्रशासक मंडळातील सर्व सदस्य हे साखर उद्योग, बँकिंग, सहकार, शेती यामधील अनुभवी असून ते या बँकेचे जुने सभासद आणि ठेवीदार आहेत. या सभासदांच्या प्रयत्नातूनच गेल्या 4 महिन्यात नवीन सभासदांकडून सुमारे रु. 2 कोटींचे भाग भांडवल जमा केल्याने बँकेचे भाग भांडवल आता रु. 4 कोटी 63 लाख इतके झाले असल्याने बँकेचे नक्त मूल्य (नेट वर्थ) अधिक झाले आहे. या भरीव कामगिरीमुळे ही बँक लवकरच निर्बंधमुक्त होईल व सभासदांना दैनंदिन व्यवहार लवकरच सुरळीतपणे करता येतील असा विश्वास नवनिर्वाचित प्रशासक मंडळाने व्यक्त केला आहे. यापुढे थकीत कर्ज वसूलीवर अधिक भर देणार असल्याचेही प्रशासक मंडळाच्या सदस्यांनी यावेळी सांगितले. पुणे सहकारी बँकेची स्थापना माजी खासदार स्व. ल. सो. तथा अण्णा जोशी यांच्या नेतृत्वाखाली 2003 मध्ये झाली होती. सध्या बँकेच्या पुण्यात शुक्रवार पेठ व बाणेर अशा 2 शाखा असून बँकेकडे ठेवी रु. 9 कोटी 50 लाखांच्या आहेत तर कर्जे रु. 5 कोटी 50 लाखांची आहेत. कोरोना काळापासून म्हणजे मार्च 2020 पासून बँकेच्या व्यावसायिक खातेदारांना आलेल्या अडचणींमुळे या बँकेची वाढत गेलेली थकीत कर्जे (एनपीए) आणि संचित तोटा यामुळे रिझर्व्ह बँकेने मार्च 2023 पासून पुणे सहकारी बँकेवर आर्थिक निर्बंध लावले आहेत. सध्या बँकेच्या खातेदारांना फक्त रु. 10 हजार काढता येत आहेत.