सेवा संकल्प रंगोत्सवात १५ फुटी भव्य रांगोळीतून केंद्र सरकारच्या योजनांचे दर्शन

सांगली :- देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या २५ वर्षांच्या राष्ट्रसेवेच्या गौरवार्थ सेवा संकल्प अभियानांतर्गत सह्याद्री नगर, सांगली येथे आयोजित ‘सेवा संकल्प रंगोत्सव’मध्ये सौ. वैशालीताई पाटील यांनी साकारलेल्या १५ फुटी भव्य रांगोळीची पाहणी आमदार सुधीर दादा गाडगीळ, भाजपा महिला मोर्चा सांगली प्रभारी सौ. मंजिरी वहिनी गाडगीळ तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली. या रांगोळीमध्ये भारताचा नकाशा साकारून त्यामध्ये वटवृक्षाची आकर्षक संकल्पना मांडण्यात आली आहे. वटवृक्षाच्या केंद्रस्थानी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे छायाचित्र दर्शविण्यात आले असून, वृक्षाच्या विविध फांद्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या १२ जनकल्याणकारी योजनांचे कलात्मक दर्शन घडविण्यात आले आहे. तसेच वटवृक्षाच्या मुळांच्या ठिकाणी कार्यसम्राट आमदार मा. सुधीर दादा गाडगीळ यांचे छायाचित्र दर्शविण्यात आले आहे. भारताचा नकाशा, वटवृक्ष आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची सांगड घालणारी ही संकल्पना राष्ट्रसेवेची भावना, विकासाचा विस्तार आणि जनकल्याणाचा संदेश प्रभावीपणे अधोरेखित करते. वटवृक्षाच्या मुळांपासून फांद्यांपर्यंतची ही रचना नेतृत्व, विकासकार्य आणि जनसेवेचे प्रतीक म्हणून साकारण्यात आली आहे. या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतीबद्दल सौ. वैशालीताई पाटील यांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित या उपक्रमाचे संयोजक म्हणून शुभम देसाई व सुमेध कुलकर्णी यांनी जबाबदारी पार पाडली. कलेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि राष्ट्रसेवेच्या कार्याचा गौरव करणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता. यावेळी ज्येष्ठ नेते श्रीकांत तात्या शिंदे, भाजपा महिला मोर्चा सांगली शहर जिल्हा प्रभारी मंजिरी गाडगीळ, सरचिटणीस विशाल पवार, उपाध्यक्ष राजू पठाण, मंडलाध्यक्ष रवींद्र वादवणे, महिला मोर्चा पश्चिम मंडलाध्यक्षा स्मिता देशमुख, मध्य मंडलाध्यक्षा स्मिता नवलाई, संयोजक शुभम देसाई, सुमेध कुलकर्णी, विद्यार्थी आघाडी जिल्हा संयोजक आयुष देसाई, नगरसेविका योगिता राठोड, नगरसेवक केदार खाडीलकर, मोहन वाटवे, माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, प्रसाद वळकुंडे, अरुणा बाबर आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.