सेवा संकल्प अभियानांतर्गत २१७५ विद्यार्थ्यांची चित्रकला, तर १७१ विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धेत सहभाग.
आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण

सांगली :- पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या २५ वर्षांच्या राष्ट्रसेवेच्या गौरवार्थ सांगली विधानसभा क्षेत्रात आयोजित ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ वक्तृत्व, चित्रकला आणि रील स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ खरे मंगल कार्यालय, विश्रामबाग, सांगली येथे उत्साहात पार पडला. या समारंभात आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. या उपक्रमाचे संयोजन शुभम देसाई, सुमेध कुलकर्णी, अमोल कणसे व विकास गुंडप यांनी केले. या अभियानांतर्गत आयोजित चित्रकला स्पर्धेत तब्बल २ हजार १७५ विद्यार्थ्यांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १७१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ‘माझ्या स्वप्नातील भारत’ आणि ‘विकसित भारत २०४७’ या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना, विचार आणि कलात्मक प्रतिभा प्रभावीपणे सादर केली. रील स्पर्धेच्या माध्यमातूनही युवकांच्या डिजिटल सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. विद्यार्थ्यांमधील वक्तृत्वकला, सर्जनशीलता, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक जाणीव वृद्धिंगत करण्याबरोबरच केंद्र व राज्य शासनाच्या विकासकामांची आणि लोककल्याणकारी योजनांची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या अभियानाच्या माध्यमातून करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतील भारताचे चित्र रेखाटत विकसित भारताच्या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि विजेत्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात योगदान देण्याची प्रेरणा मिळते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या समारंभास ज्येष्ठ नेते श्रीकांत तात्या शिंदे, भाजपा महिला मोर्चा सांगली शहर जिल्हा प्रभारी सौ. मंजिरी गाडगीळ, सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय नामजोशी सर, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रिद्धी म्हामुलकर, सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष राजू पठाण, सचिव उदय मुळे, पश्चिम मंडलाध्यक्ष रवींद्र वादवणे, पश्चिम मंडल महिला मोर्चा अध्यक्षा स्मिता देशमुख, प्रशांत गौंडाजे, सोशल मीडिया आघाडी जिल्हाध्यक्ष शुभम देसाई, सांस्कृतिक आघाडी जिल्हा संयोजक सुमेध कुलकर्णी, शुभम चव्हाण आदी भाजपा पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
