आ. सुधीर गाडगीळ यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा, अभिष्टचिंतनासाठी अलोट गर्दी

सांगली प्रतिनिधी :- सांगली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचा वाढदिवस शुक्रवार दि.४ रोजी विविध सामाजिक उपक्रमाने अत्यंत उत्साहात साजरा झाला. भारतीय जनता पक्षासह विविध पक्ष, संघटना आणि संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे प्रभारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार सुरेश खाडे तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार यांनी सुधीरदादांचे अभिष्टचिंतन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही शुभेच्छादर्शक संदेश पाठवण्यात आला. आ. गाडगीळ यांच्या विश्रामबाग येथील संपर्क कार्यालयाच्या आवारात सायंकाळी शुभेच्छा देण्यासाठी सांगली विधानसभा मतदारसंघातील तसेच जिल्ह्यातीलही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक संस्थाचे पदाधिकारी व संचालकांनीही आ. गाडगीळ यांना शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त सांगली विधानसभा मतदारसंघात दिवसभर विविध उपक्रम साजरे करण्यात आले. हरिपूर रस्त्यावरील वीर शिवा काशीद मंडळाच्या कार्यालयाला अडीचशे खुर्च्या आ. गाडगीळ यांनी भेट दिल्या. सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात हृदय रुग्णांसाठी विशेष उपकरण आ. गाडगीळ यांनी स्वखर्चातून दिले. महापालिकेच्या वसंतदादा पाटील शाळा नंबर एक मध्ये विद्यार्थी ,विद्यार्थिनींना दप्तरे आणि शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. संजयनगर येथे वहीतुला उपक्रम झाला. यावेळी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना त्यांचे वाटप करण्यात आले. कर्ण संस्थेमध्ये मुला, मुलींसाठी जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. यशवंतनगर येथे नेत्र तपासणी शिबिर गेले आठ दिवस सुरू होते. वृद्ध नागरिकांना चष्म्याचे वाटप करून या शिबिराचा समारोप झाला. तसेच यशवंतनगरमधील राजेंद्र हाऊसिंग सोसायटीच्या परिसरात १७० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. शारदा हाऊसिंग सोसायटी येथे माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार यांनी आ. गाडगीळ यांची वही तुला केली. हॉटेल ककुन येथे विविध सामाजिक संस्थांशी संलग्न विद्यार्थ्यांच्या समवेत आ. गाडगीळ यांनी वाढदिवस साजरा केला.
भाजप पक्ष कार्यालयासाठी २५ लाखांचा निधी – भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हा कार्यालय सांगलीतील कुंभार मळा येथे उभारण्यात येत आहे. त्याचे बांधकाम सध्या सुरू आहे. या कार्यालयाच्या उभारणीसाठी आमदार गाडगीळ यांनी वैयक्तिक२५ लाख रुपयांची देणगी आज दिली. या देणगीचा धनादेश पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे आणि पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्याकडे आमदार गाडगीळ यांनी सुपूर्त केला.
