सेवाकार्यात स्वयंसेवी संस्थांची भूमिका महत्वाची – मुख्यमंत्री फडणवीस
भारत विकास परिषदेने रचला कृत्रिम पाय बसविण्याचा विश्वविक्रम

पुणे प्रतिनिधी :- भारतात सेवेची परंपरा खूप मोठी असून सेवा कार्याचा संस्कार आपल्या प्रत्येकात आहे. सेवाकार्य करण्यासाठी सरकार सोबत स्वयंसेवी संस्था उभ्या राहिल्या तर कार्याची गती अधिक वाढेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. भारत विकास परिषदेच्या नवभारत फौंडेशनने फक्त साडेचार तासात एकूण ८९२ दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव बसवण्यात आले. या विश्वविक्रमाचे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भारत विकास परिषदेला प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सागर ढोले पाटील, राजेश पांडे, भारत विकास परिषदेचे दत्ता चितळे, विनय खटावकर, राजेंद्र जोग उपस्थित होते. भारत विकास परिषदेच्या पुण्यातील विकलांग पुनर्वसन केंद्रातर्फे अवघ्या साडेचार तासात तब्बल 892 दिव्यांगांना कृत्रिम पाय (मॉड्यूलर फूट) व कृत्रिम हात बसवून विश्वविक्रम झाला असल्याची घोषणा गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसचे मुख्य प्रतिनिधी स्वप्नील डांगरीकर यांनी आज येथे केली व प्रमाणपत्र दिले. पुण्यातील ढोले-पाटील शिक्षण संस्थेच्या खराडी येथील महाविद्यालयात राज्यस्तरीय शिबिर घेण्यात आले, त्यामध्ये झालेला विश्वविक्रम भारत विकास परिषद नवभारत फौंडेशनच्या दत्ता चितळे आणि ढोले-पाटील शिक्षण संस्थेच्या सागर ढोले-पाटील यांच्या नावावर नोंदविला गेला. आजच्या विश्वविक्रमी दिव्यांगांमध्ये सुमारे 200 महिलांचा देखील समावेश आहे. यावेळी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसकरिताचे समन्वयक मिलिंद वेर्लेकर तसेच दिव्यांगांच्या वैद्यकिय तपासणीकरिता डॉ. तापडीया, डॉ. मिलिंद गांधी, डॉ. नागापूरकर आदी उपस्थित होते. यापूर्वीचा विश्वविक्रम गुजरातमध्ये 2021 साली 8 तासात 710 दिव्यांगाना कृत्रिम पाय बसविण्याचा झाला होता. यावेळी खटावकर म्हणाले की, पुण्यातील विकलांग पुनर्वसन केंद्र सन 1997 मध्ये गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरु झाले. या केंद्रातर्फे सुमारे 50 हजार रुपये किंमतीचा अत्याधुनिक मोड्युलर फूट मोफत बसविला जातो. परिषदेने गेल्या 25 वर्षात 25 हजार पेक्षाही जास्त कृत्रिम अवयव परिषदेने मोफत दिले आहेत. या केंद्राच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ 16 डिसेंबर 2024 रोजी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता. त्यादिवशी 800 पेक्षा जास्त दिव्यांग व्यक्तींच्या पायाची मोजमापे घेण्यात आली होती. त्यांना आज कृत्रिम पाय (मॉड्युलर फूट) व कृत्रिम हात मोफत बसविण्यात आले व त्याचाच हा विश्वविक्रम झाला आहे. यावेळी चितळे म्हणाले की, सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून दिव्यांग गरजूंची सेवा आपुलकीने करणे हे दायित्व, कर्तव्य आणि सामाजिक ऋण भारत विकास परिषदेने जोपासले असून संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा आणि समर्पण या पंचसूत्रीच्या आधारावर संपूर्ण देशभर सुमारे 1500 शाखांच्या माध्यमातून हे सामाजिक कार्य सुरु आहे. सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले तर श्रीनिवास कुलकर्णी यांनी आभार मानले.