चित्रकला हे अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम – राजेंद्र मेढेकर

चित्रकला प्रशिक्षण कार्यक्रमाचा सांगलीत समारोप

सांगली :- चित्रकला हजारो वर्षे कलाकाराच्या अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम असून आजही त्याचे महत्त्व अबाधित आहे असे प्रतिपादन केंद्रीय जीएसटी वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर यांनी नुकतेच केले. ते समृद्धी सेवा संस्थेतर्फे आयोजित लँडस्केप चित्रकला कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी उद्योजक सुभाष चिकोडीकर उपस्थित होते. काळ , माध्यम, शैली व विषय जरी बदलत असले तरी चित्रातून कलाकाराच्या भावना , कल्पना , स्वप्ने, अनुभव याना चित्रकलेच्या माध्यमातून लोकांच्या समोर आणताना कलाकाराची सर्जनशीलता दिसून येते असे ते म्हणाले. निसर्ग चित्रणा कार्यशाळेमध्ये नव कृष्णा व्हॅली चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य सुमेध कुलकर्णी यांनी निसर्ग चित्रणाविषयी प्राथमिक माहिती दिली. कुलकर्णी यांनी त्यामध्ये पेन्सिल कशी पकडावी, रंग कोणते वापरावेत, चित्र कसे काढावे, त्याची मांडणी कशी असावी, दोन रंगांमध्ये कसे चित्र पूर्ण करावे आणि पाण्याचे रंग कसे हाताळावेत, याची माहिती दिली. जिल्हाधिकारी अशोक काकडे तसेच जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी सदर प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. युवा उद्योजक मॅग्नेविन एनर्जी चे मुकुंद चिपलकट्टी यांचे ही या साठी सहकार्य लाभले. योगिता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. अरुणा देशपांडे आणि संजीव कुलकर्णी यांनी कार्यशाळेचे आयोजन केले.