अभाविप म्हणजे देशभक्त विद्यार्थी घडवण्याचे विद्यापीठ – पद्मश्री मिलिंद कांबळे
अभाविपच्या प्रदेश अधिवेशनाचे उद्घाटन.

सोलापूर :- विकसित भारत घडविण्यासाठी विद्यार्थी युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे राष्ट्रहिताकरिता जीवन समर्पित करणारे देशभक्त विद्यार्थी घडविण्याचे विद्यापीठ आहे, असे प्रतिपादन पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५९ व्या प्रदेश अधिवेशनाचे उद्घाटन सोमवारी पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी अभाविपचे राष्ट्रीय सह संघटनमंत्री देवदत्त जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. हरीभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात हे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन स्थळाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले आहे. अधिवेशन उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर अभाविपचे राष्ट्रीय सह संघटनमंत्री देवदत्त जोशी, अधिवेशनाचे स्वागत समिती अध्यक्ष अंकुर पंधे, स्वागत समिती सचिव सुहास जोशी, प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ. शांतिनाथ बागेवाडी, प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी, अभाविपच्या प्रदेश सहमंत्री श्रेया चंदन, महानगर अध्यक्ष प्रा. डॉ. प्रशांत चाबुकस्वार, महानगरमंत्री यश उडाणशिव, उपस्थित होते. प्रारंभी पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन झाले. पद्मश्री मिलिंद कांबळे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार समाजात पोहोचणे आवश्यक आहे. नोकरी मागणारे नको तर नोकरी देणारे तरुण घडावेत यासाठी कार्य करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी युवकांच्या सक्रिय सहभागानेच देशाचा सर्वांगीण विकास होणार आहे. या प्रवासात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सिंहाचा वाटा या पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना असा नावलौकिक असलेल्या अभाविपचे राष्ट्र विकासात अखंड योगदान आहे. आणीबाणीला विरोध, भ्रष्टाचारविरोधी आंदोलन तसेच जम्मू कश्मीरसारख्या आंदोलनामध्ये अभाविपने प्रचंड संघर्ष केला आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यातही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मोठा वाटा आहे, असेही पद्मश्री मिलिंद कांबळे म्हणाले. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष प्रा. शांतिनाथ बागेवाडी, प्रदेशमंत्री अथर्व कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत समिती अध्यक्ष अंकुर पंधे यांनी प्रास्ताविक केले. स्वागत समिती सचिव सुहास जोशी यांनी सूत्रसंचालन तर महानगरमंत्री यश उडाणशिव यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास आमदार देवेंद्र कोठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र. कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, स्वागत समितीचे संरक्षक रंगनाथ बंकापूर, शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेचे निमंत्रित संचालक श्रीरंग कुलकर्णी, शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेचे शालेय समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन, शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य संजय परमणे, अभाविपचे राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्य प्रा. प्रशांत साठे, राष्ट्रीय मंत्री शालिनी वर्मा, पश्चिम क्षेत्र क्षेत्रीय संघटनमंत्री गितेश चव्हाण, सांगली विभाग प्रमुख प्रा. निर्भयकुमार विसपुते, राष्ट्रीय मंत्री शालिनी वर्मा आदी उपस्थित होते.