सहकार कायदा बदल व नवीन सहकारी धोरणावर संगमनेर येथे चर्चासत्र संपन्न

संगमनेर : सहकार भारतीच्या वतीने “सहकार कायदा बदल व नवीन सहकारी धोरण” या विषयावर व्यापारी असोसिएशन हॉल, संगमनेर येथे १६ जून रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तथा सहकार क्षेत्राचे अभ्यासू मार्गदर्शक विवेक जुगादे यांनी आपल्या ओघवत्या आणि प्रभावी भाषणशैलीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. संपूर्ण महाराष्ट्रभर नवीन सहकारी धोरणाबाबत जनमत जाणून घेण्यासाठी दौरा करीत असलेल्या श्री. जुगादे यांनी सहकार क्षेत्रातील बदलत्या गरजांचा सखोल आढावा घेतला. सहकार कायद्यात आवश्यक बदल करताना लोकसहभागातून सर्वसामान्यांच्या अपेक्षा व भावना जाणून घेऊनच नवीन धोरण तयार व्हावे, असा आग्रह त्यांनी सरकार पुढे कायमच ठेवला होता. यावेळी बोलताना त्यांनी भ्रष्टाचारमुक्त व राजकीय हस्तक्षेपमुक्त सहकाराची गरज अधोरेखित केली. नवीन पिढीने सहकार क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा. महिलांचा सहभाग वाढावा तसेच आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सहकार क्षेत्राला पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचून कार्य करणारी सहकार ही एकमेव व्यवस्था असून ठेवीदारांचा विश्वास आणि कर्जदारांची गरज यांचा समतोल साधणारी ही एकमेव प्रभावी यंत्रणा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. या चर्चासत्रासाठी व्यासपीठावर मा. उपनिबंधक संतोष कोरे, विभाग प्रमुख संतोष गायकवाड, जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, जिल्हा महामंत्री योगेश उपासनी, तालुकाध्यक्ष अनिल रोहम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सहकारी कायदा व नवीन धोरणामध्ये अपेक्षित बदलांबाबत आपली मते मांडली. यावेळी सहकार भारतीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. पराग सराफ, बँक प्रकोष्ठ प्रमुख प्रकाशजी कलंत्री, एस.झेड. देशमुख, बापूसाहेब टाक, श्रीगोपाल पडतानी यांच्यासह संगमनेर शहरातील सहकार क्षेत्रातील अनेक तज्ञ व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा महामंत्री योगेश उपासनी, तालुकाध्यक्ष अनिल रोहम, उपाध्यक्ष शिवाजी घुगे, प्रवीण मुळे ,तालुका उपाध्यक्ष सुनीता आरोटे तसेच सहकार भारतीच्या जिल्हा व तालुका कार्यकारिणीने विशेष परिश्रम घेतले. यावेळी रविकाका बोरावके, संतोष गायकवाड, प्रवीण बुलाख यांच्यासह सहकार भारतीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन देवयानी जोशी यांनी केले.
