‘जिंकण्यासाठी सर्व काही’ विषयावर ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांचे प्रेरणादायी व्याख्यान

मिरज – दि मिरज एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सोमवार, दि. ४ ऑगस्ट रोजी ज्युबिली इंग्लिश गर्ल्स स्कूल, मिरज येथे ज्येष्ठ पत्रकार, वक्ते व शिक्षणतज्ज्ञ डॉ. उदय निरगुडकर यांचे” जिंकण्यासाठी सर्व काही ” या विषयावर स्फूर्तीदायी व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजय धामणगांवकर होते. तर प्रमुख उपस्थितीत प्रदीपराव शिरगुरकर, सौ. निवेदिता देशपांडे, चंद्रकांत देशपांडे, सौ. कविता चौथाई, ए. के. देशपांडे, सुनील दिवेकर, धनंजय दिवेकर, मनीषा कुलकर्णी व सुमेधा रानडे यांचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात उपमुख्याध्यापिका सौ. उषा कुलकर्णी यांच्या प्रास्ताविकाने झाली. सौ. कविता चौथाई यांनी डॉ. निरगुडकर यांचा परिचय दिला. संस्थेच्या वतीने अध्यक्ष संजय धामणगांवकर यांनी शाल, श्रीफळ व श्रीराम मूर्ती देऊन डॉ. निरगुडकर यांचा सन्मान केला. सूत्रसंचालन सौ. हर्षदा बेडेकर यांनी केले. डॉ. उदय निरगुडकर यांनी आपल्या भाषणात शिक्षण, संस्कार, गुणवत्ता आणि राष्ट्रनिर्मिती यांचा सुंदर मिलाफ साधत उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी बोलताना ते म्हणाले “ मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण मला चांगली आई आणि उत्तम शिक्षक लाभले. ७८ देशांचा प्रवास करताना जाणवले की अमेरिकेसारखा देश श्रीमंत आहे कारण तो शिक्षणात गुंतवणूक करतो. आपल्या देशालाही शिक्षणाच्या बळावरच पुढे जायचे आहे.” त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी आंतरिक प्रेरणा, चिंतन-मनन, कठोर परिश्रम, वाचन आणि शिस्त यांचा अंगीकार केला पाहिजे. शिक्षकांनी अध्यापन करताना विषयाची अभ्यासपूर्व तयारी, उपयुक्त पाठनियोजन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारी शिकवण देणे आवश्यक आहे. “शाळा ही ज्ञानवर्धिनी, संस्कारक्षम व प्रेरणादायी असली पाहिजे. विद्यार्थी शाळेत आनंदाने यावा आणि शाळा सुटली तरीही तिथे रेंगाळावा अशी शाळा प्रत्येक गावात उभी राहिली पाहिजे” असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. पल्लवी भाट व सौ. रत्नप्रभा पवार यांनी केले. संस्थेचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थिनींचा मोठा सहभाग या कार्यक्रमात लाभला.
शैक्षणिक प्रयोगशाळांची पाहणी व कौतुक – डॉ. निरगुडकर यांनी इनोव्हेशन स्किलिंग सेंटर, AI, IOT, रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग, सायन्स पार्क, मॅथ्स लॅब, लँग्वेज लॅब या आधुनिक सुविधांची पाहणी करत प्रशंसा केली. त्यांनी “मिरजेतील दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधांची उभारणी हा स्तुत्य उपक्रम असून, संस्थेचा दृष्टिकोन वाखाणण्याजोगा आहे. यामुळे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने ठोस पाऊल उचलले गेले आहे” अशी भावना यावेळी व्यक्त केली.