विवेकानंद सोसायटीला सहकार आयुक्त यांची सदिच्छा भेट

नागपूर: विदर्भातील सहकार क्षेत्रात नावलौकिक प्राप्त विवेकानंद नागरी सहकारी प्रत्यय संस्थेला महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष व सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सहकार आयुक्तांचा सत्कार केला. सहकार आयुक्तांनी संस्थेच्या संपूर्ण कार्याची विस्तृत माहिती जाणून घेत संस्थेच्या प्रगतीबद्दल व समाजासाठी देत असलेल्या भरीव योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी सहकार आयुक्त तावरे यांनी उपस्थित संचालकांशी संवाद साधला. आपल्या महाराष्ट्रात सहकारी पतसंस्था चळवळ ही अतिशय सुदृढ असून विवेकानंद पतसंस्थेसारख्या चांगल्या संस्थांच्या भरोशावरच ही चळवळ टिकून आहे. नि:स्वार्थ भावनेने व प्रामाणिकतेने काम केल्यास सहकारी पतसंस्था अतिशय उत्तमपणे चालू शकतात, याचा आदर्श विवेकानंद नागरी सहकारी प्रत्यय संस्थेने घालून दिला आहे. गरजवंतांना अर्थसाह्य करून विवेकानंद सोसायटी समाजसेवेचा आपला वारसा पुढे नेत आहे याचा आम्हाला आनंद असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. विवेकानंद सोसायटीवर ग्राहकांचा असलेला विश्वास यामुळेच ही संस्था दिवसेंदिवस प्रगती करीत आहे. संस्थेने यापुढेही आपली अशीच घोडदौड चालू ठेवावी यासाठी त्यांनी संस्थेला भरभरून शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष विवेक जुगादे यांनी संस्थेच्या प्रगतीची माहिती सहकार आयुकांना दिली. संस्थेने मागील आर्थिक वर्षात 173 कोटींचा व्यवसाय केला असून संस्थेचा नफा 3 कोटींच्या वर असल्याचे त्यांनी सांगितले. यंदाच्या आर्थिक वर्षात संस्थेने 200 कोटींच्या व्यवसायाचे लक्ष निश्चित केले असून संस्था त्या दिशेने वाटचाल करीत आहे. गरजवंतांना कमी व्याजदरावर आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे यासाठी संस्था नेहमीच अग्रेसर राहत असल्याचे विवेक जुगादे यांनी सांगितले. याप्रसंगी विभागीय सहनिबंधक श्री प्रवीण वानखेडे, विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण) श्री सदानंद उईके, जिल्हा उपनिबंधक श्री अजय कडू, सहाय्यक निबंधक श्री पंकज वानखेडे यांच्यासह संस्थेचे संचालक श्री सुधीर दप्तरी, श्री कल्याण दिवाण, श्री विवेक बापट, श्री विवेक धाक्रस, डॉ सौ राधिका मुरकुटे, डॉ सौ माधुरी इंदुरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
