सांगली महापालिका क्षेत्रात थकीत पाणीपट्टीवरील व्याज, विलंब शुल्कात शंभर टक्के सूट मिळावी – आ. सुधीरदादा गाडगीळ

आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

सांगली :- सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील नागरिकांना थकीत पाणीपट्टीवरील व्याज विलंबशुल्कास शंभर टक्के सूट मिळावी अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन आमदार गाडगीळ यांनी त्यांना या मागणीचे निवेदन दिले. तसेच नामदार शिंदे यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली. आमदार गाडगीळ यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले की, महापालिका क्षेत्रात पाणीपट्टीची थकबाकी आहे.त्या थकबाकीवर विलंब शुल्क तसेच व्याज आकारले जाते. त्यामुळे नागरिक अशी थकीत पाणीपट्टी भरण्यास तयार होत नाहीत. यासाठी महापालिकेने अशा थकीत पाणीपट्टीवर विलंबशुल्क आणि व्याज यामध्ये सूट देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे. त्या प्रस्तावामध्ये या संदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली आहे.तो प्रस्ताव तातडीने मंजूर करावा. त्यामुळे महापालिकेची पाणीपट्टीची थकबाकी वसुली चांगली होऊ शकेल. नागरिक पुढाकार घेऊन महापालिकेची पाणीपट्टीची थकबाकी भरतील. परिणामी महापालिकेचे उत्पन्नही वाढेल. त्यामुळे शासनाने तातडीने थकीत पाणीपट्टीवरील व्याज विलंब शुल्क सूट देण्याच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी.