नागरिकांवरील अवाजवी घरपट्टीचा बोजा कमी करा

पुण्यातील बैठकीत आमदार सुधीर गाडगीळ यांची सूचना

सांगली :- सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेने केलेली घरपट्टी वाढ अवाजवी असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ती वाढ तातडीने कमी करा तरच नागरिक घरपट्टी भरतील आणि परिणामी महापालिकेला उत्पन्न मिळू शकेल, अशी सूचना आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली. पुणे येथे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या विभागीय आढावा बैठकीत आमदार गाडगीळ बोलत होते. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार तसेच सांगली, मिरज ,कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. आमदार गाडगीळ म्हणाले, महापालिका प्रशासनाने सध्या केलेली घरपट्टी वाढ ही अवास्तव आणि अवाजवी आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांचा या घरपट्टीवाढीला प्रचंड विरोध आहे. नागरिक सातत्याने महापालिकेकडे तक्रारी देत आहेत. महापालिकेने जर घरपट्टी वाढ कमी केली नाही तर नागरिक घरपट्टी भरणार नाहीत आणि महापालिकेला उत्पन्नही मिळणार नाही. महापालिकेचे घरपट्टीचे उत्पन्न ३०० कोटी रुपये करण्यासाठी म्हणून ही दरवाढ केल्याचे आयुक्त गुप्ता यांनी यावेळी सांगितले. त्यासंदर्भात आमदार गाडगीळ म्हणाले, महापालिकेचे उत्पन्न वाढले पाहिजे ही वस्तुस्थिती आहे. परंतु अशा पद्धतीने घरपट्टी किंवा पाणीपट्टीमध्ये वाढ करून उत्पन्न वाढणार नाही. कारण अन्यायकारक वाढ केली तर लोक घरपट्टी नाहीत. नागरिकांचा हा बहिष्कार असाच कायम राहिला तर महापालिकेचे उत्पन्न बिलकुल वाढणार नाही. त्यामुळे वास्तव आणि वाजवी अशी घरपट्टी असेल तरच नागरिक ती भरतील आणि महापालिकेचे उत्पन्नही त्यामुळे वाढेल. दरम्यान आमदार गाडगीळ यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बरोबरही या घरपट्टी वाडीसंदर्भात चर्चा केली. घरपट्टी वाढ तातडीने कमी केली पाहिजे असेही त्यांनी पालकमंत्री पाटील यांना सांगितले.