आमदार प्रकाश आवाडे यांना स्व. अण्णासाहेब गोडबोले स्मृती पुरस्कार जाहीर.

सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश त्रैवार्षिक अधिवेशन २१-२२ सप्टेंबर रोजी शिर्डी येथे होणार

आमदार प्रकाश आवाडे

पुणे प्रतिनिधी :- सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे चौदावे त्रैवार्षिक अधिवेशन दि. २१ व २२ सप्टेंबर २०१४ रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आले असून या अधिवेशना मध्ये महाराष्ट्रातून सुमारे १५०० सहकार भारतीचे क्रियाशील कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती सहकार भारतीच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. शशीताई अहिरे, महामंत्री विवेक जुगादे व राष्ट्रीय प्रकाशन प्रमुख भालचंद्र कुलकर्णी यांनी दिली. या अधिवेशनाचे उ‌द्घाटक या नात्याने केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी या नात्याने राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आहेत. यासोबतच सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनानाथ ठाकूर, राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी, राष्ट्रीय संघटनमंत्री संजय पाचपोर अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत तर अधिवेशन प्रमुख ॲड.रविकाका बोरावके व अधिवेशन सहप्रमुख अभिनाथ शिदे हे काम पाहत आहेत. सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाच्यावतीने या अधिवेशनामध्ये सहकार भारतीचे संस्थापक अध्यक्ष स्व. अण्णासाहेब गोडबोले यांच्या नावाने सहकार क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो. यंदाच्या अधिवेशनामध्ये हा मानाचा पुरस्कार सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांना जाहीर झाला आहे. शनिवार, २१ सप्टेंबर रोजी सायं. ६ वाजता शिर्डी येथील अधिवेशनस्थळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या अधिवेशनात महाराष्ट्र प्रदेशाची पुढील ३ वर्षासाठीची नवीन कार्यकारिणी देखील निवडली जाणार असल्याचे विवेक जुगादे यांनी यावेळी सांगितले. सहकार चळवळीत बिना संस्कार नही सहकार हे ब्रीद घेऊन सहकार भारती १९७८ पासून कार्यरत असून आज देशभरात सर्वत्र सहकाराच्या शुद्धी आणि वृध्दी साठी असंख्य कार्यकर्ते काम करीत आहेत. सहकार भारतीच्या विशेष प्रयत्नांमुळेच सहकाराचे स्वतंत्र मंत्रालय आज केंद्र सरकारमध्ये स्थापन झाले आहे. सहकार भारतीचे मुखपत्र सहकार सुगंध, सहकार प्रशिक्षण संस्था अशा माध्यमातून देखील सहकार भारती सर्वदूर पोहचली आहे.