आमदार सुधीर गाडगीळ यांची विजयाची हॅट्रिक

सांगली :- सांगली विधानसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत भाजप महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांनी हॅट्रिक केली आहे. अत्यंत चुरशीची ही लढत आमदार सुधीर गाडगीळ यांनी जिंकली. त्यांनी नजीकचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा ३६ हजार १३५ मतांनी पराभव केला. आमदार गाडगीळ यांना १,१२,४९८, पृथ्वीराज पाटील यांना ७६, ३६३, तर जयश्री पाटील यांना ३२,७३६ मते मिळाली. सांगली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तरुण भारत स्टेडियम येथे सकाळी आठ वाजता सुरू झाली. पहिल्या फेरी पासूनच सुधीर गाडगीळ यांनी आघाडी घेतली. आघाडी वाढत होती तसा कार्यकर्त्यांचा जल्लोषही वाढत गेला. आमदार गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीत आणि गुलालाच्या उधळणीत विजय मिरवणूक काढण्यात आली. विश्रामबाग चौकातून पुष्पराज चौकात मिरवणूक आली. तेथे व्यासपीठ उभारण्यात आले होते. येथे आमदार गाडगीळ यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. तेथून राम मंदिर चौकात मिरवणूक आली. श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने राम मंदिर चौकात कार्यकर्त्यांनी जेसीबीने गुलाल आणि फुलांची उधळण करत जल्लोष केला. नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले. काँग्रेस कमिटीमार्गे गणपती मंदिरात दर्शनासाठी ही मिरवणूक गेली. विजय झाल्यानंतर आमदार गाडगीळ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारले. या मिरवणुकीत प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार, गणेश गाडगीळ, गौतम पवार, धीरज सूर्यवंशी, सिद्धार्थ गाडगीळ, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विष्णू माने, पद्माकर जगदाळे, शिवसेनेचे महेंद्र चंडाळे, नानासाहेब शिंदे तसेच महायुती मधील नेते व पदाधिकारी उपस्थित होते.