प्रत्येक व्यक्तीचा विकास सहकारातूनच होणे शक्य – संजय पाचपोर

धाराशिव :- समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येक व्यक्तीचा विकास होण्यासाठी सहकाराची आवश्यकता असून विना सहकार नाही उद्धार हे सर्वार्थाने प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येकाने सहकारातून समृद्धीकडे जाण्यासाठी काम करणाऱ्या सहकार भारती सोबत जोडून काम करण्याची गरज सहकार भारतीचे अखिल भारतीय राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी व्यक्त केली, ते धाराशिव येथे सहकार भारतीच्या वतीने आयोजित इफको या आशिया खंडातील सर्वात मोठ्या इफको या कंपनीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत संचालक म्हणून निवडून आल्याबद्दल कळंब येथील डॉ. वर्षा कस्तुरकर यांच्या सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे, अखिल भारतीय सेवा भारतीच्या सचिव चंद्रिका चव्हाण, सहकार भारतीचे धाराशिवचे अध्यक्ष संतोष तौर , उपाध्यक्ष उध्दव गपाट , जिल्हा मंत्री डॉ. हर्षल डंबळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पाचपोर पुढे म्हणाले की ,ज्या सहकार चळवळीची सुरुवात महाराष्ट्रात झाली त्या सहकार चळवळीला गती देण्याची गरज आहे . सर्व क्षेत्रात सहकारी संस्था स्थापन करून आर्थिक परिवर्तनाची ताकद सर्वसामान्यांच्या हातात यावी यासाठी सहकार भारती कार्य करत आहे . ” विना संस्कार नाही सहकार ” हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून सहकार क्षेत्रातल्या संस्थांचे जाळे उभारण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी पुढे यावे. देशातल्या सर्वात मोठ्या सहकारी संस्था असलेल्या इफको आणि अमूल या संस्थांमध्ये सरकारी भाग भांडवल नाही केवळ सर्व सामान्यांच्या शेअर्स गुंतवणुकीमुळे या मध्ये सरकारी हस्तक्षेप कमी होऊन प्रत्येक सभासदाला प्रतिष्ठा मिळाली आहे व मिळत आहे. सेवा पुरवठादार तसेच शेती आणि शेती प्रक्रिया क्षेत्रात ,अन्नप्रक्रिया ,उद्योग , वाहतूक यासह विज्ञान तंत्रज्ञान आणि सर्व क्षेत्रात सहकारी संस्थांच्या उभारणीला मोठा वाव आहे .सहकार भारतीने पतसंस्था, सहकारी बँकात काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला प्रशिक्षित करून कामात गतिमानता येण्यासह अनेक नागरिकांना यात जोडण्यासाठी अधिवेशने,प्रशिक्षणे,कार्यक्रम, बैठका, देशभर प्रवास करून काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक राज्यात सहकार क्षेत्र वाढवण्यासाठी आणि समृद्ध सक्षम करण्यासाठी सुरू ठेवलेल्या प्रयत्नांची माहिती ही पाचपोर यांनी यावेळी दिली. डॉ.सौ. कस्तुरकर यांनी संचालक म्हणून, इफ्को या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी बी बियाणे खते यासह इतर उत्पादनांसोबत शेतीसाठी ड्रोनदीदी यासारख्या केंद्र सरकारच्या नवनवीन योजना संकल्पनांमधून महिला शेतकऱ्यांनाही प्रशिक्षित करण्यासह शेती व्यवसायाभिमुख विविध प्रशिक्षण कौशल्य यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून इफकोच्या योजना प्रभावीपणे राबवून जबाबदारीला न्याय द्यावा ,अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना डॉ. कस्तुरकर यांनी सहकार भारतीमुळे आपणाला देशपातळीवरील सर्वात मोठ्या सहकारी संस्थेची संचालिका म्हणून काम करण्याची संधी सहकार भारतीमुळे मिळाल्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आगामी काळात धाराशिव जिल्हा सह महाराष्ट्रात आणि देशात शेतकऱ्यांसाठी इफ्कोच्या सर्व योजना बी बियाणे खते यासह ड्रोन दिदी या महिला शेतकऱ्यांसाठीच्या योजनांवर भर देणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष तौर यांनी केले. आभार डॉ. हर्षल डंबळ यांनी मानले. अभिलाष लोमटे यांनी सूत्रसंचालन केले, तर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला धाराशिव जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थांचे पदाधिकारी तसेच कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.