लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्याची लोकसभेत मागणी

नवी दिल्ली (वृतसेवा) :- साहित्यरत्न, महाराष्ट्र भूषण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत केली. लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान त्यांनी हा मुद्दा मांडला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती १ ऑगस्टला आहे, त्या पार्श्वभूमीवर खासदार वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत ही मागणी केली. ‘जग बदल घालून घाव, मज सांगून गेले भीमराव’ या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या ओळींनी त्यांनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा दाखलाही दिला. त्या म्हणाल्या, ३५ कादंबऱ्या, १० लोकनाट्य, २४ लघुकथा, १० पोवाडे, १ नाट्य, प्रवासवर्णन, असे विपुल लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या “फकिरा” कादंबरीला महाराष्ट्र राज्यानेही पुरस्कार दिला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांचे योगदान आहे. उभे आयुष्य मानवतेसाठी समर्पित करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या वास्तव्यदर्शी साहित्यातून माणूस आणि मानवी वृत्तीचे दर्शनघडवले आहे. म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी त्यांनी लोकसभेत केली.