शिवाजी विद्यापीठ अधिसभेवर आमदार सुधीर गाडगीळ यांची नियुक्ती

सांगली प्रतिनिधी :- शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य म्हणून आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही नियुक्ती केली आहे. आमदार गाडगीळ यांचे या नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून विधानसभेच्या एका सदस्याची नेमणूक केली जाते. त्यानुसार आमदार गाडगीळ यांची अध्यक्ष नार्वेकर यांनी नियुक्ती केली आहे. त्या संदर्भातील अध्यादेश नुकताच विधिमंडळ सचिवालयातर्फे देण्यात आला आहे. या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करून आमदार गाडगीळ म्हणाले, महान शैक्षणिक परंपरा असलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेचा सदस्य म्हणून काम करण्याची मला विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांनी संधी दिली आहे. त्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे. शिवाजी विद्यापीठ क्षेत्र तसेच सांगली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाच्या आणि प्रगतीच्या दृष्टीने मी अधिसभेचा सदस्य म्हणून यथाशक्ती प्रयत्न करीन. शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीन.