“सहकार संवाद” कार्यक्रमाने सहकार सप्ताहाची पुण्यात सुरुवात

पुणे :- सहकार क्षेत्रात विश्वासाहर्ता वाढण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे तसेच कामकाजात बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरत परिवर्तन करण्याची मानसिकता असायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ सहकार आणि बँकिंग तज्ञ गणेश निमकर यांनी आज येथे केले. सहकार सप्ताहानिमित्त “सहकार भारती – पुणे महानगर” आयोजित “सहकार संवाद” कार्यक्रम (१४ नोव्हेंबर) पुण्यातील अंबर हॉल, कर्वे रोड येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश संघटन प्रमुख शरद जाधव यांनी सहकार भारतीच्या कार्याचा आढावा घेतला तर डॉ. मुकुंद तापकीर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी सहकार भारती पुणे महानगर अध्यक्ष सीए दिनेश गांधी होते. स्वागत आणि सूत्रसंचालन “सहकार सुगंध”चे संपादक भालचंद्र कुलकर्णी यांनी केले. यावेळी सर्व उपस्थित संस्थांना “सहकार महर्षी” ग्रंथ भेट देण्यात आला. या कार्यक्रमाला बँक, पतसंस्था आणि गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, संचालक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये बुलडाणा मल्टीस्टेटचे शिरीष देशपांडे, जनता बँकेचे अभय माटे, संपदा बँकेचे मुकुंद भालेराव, बँकर जयंत काकतकर, सारस पतसंस्थेचे गणेश धारप, सरस्वती पतसंस्थेच्या सुचित्रा दिवाण, सुरभी पतसंस्थेच्या वसुधा खरे, चिंतामणी पतसंस्थेचे सुधीर दप्तरदार, उद्यम विकास बँकेचे संदीप खर्डेकर, जयवंत कडू, सहकार भारतीचे श्रीकांत पटवर्धन, औदुंबर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी १००% मतदान करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.