सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी बैठक उत्साहात संपन्न

मुंबई :- सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी समितीची बैठक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन येथे उत्साहात पार पडली. या बैठकीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व आमदार नरेंद्र मेहता व मान्यवर यांचे हस्ते दिप प्रज्वलन करून झाले. प्रास्ताविक प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी केले. ते म्हणाले सहकार भारती हि शासन आणि सहकारी संस्था यांच्या मधील एक दुवा म्हणून कार्य करत आहे. सहकारी संस्थाच्या अडचणी शासनस्तरापर्यंत मांडून त्याचा पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावले जातात. सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या गतिमान कार्यापद्धतीमुळे सहकार खात्यातील अनेक प्रश्नमार्गी लागले आहेत. उद्घाटनप्रसंगी डॉ. पंकज भोयर यांनी सहकार चळवळीला चालना देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच सहकारी संस्थांनी पारदर्शकतेसह कार्य करावे, असा संदेश दिला. आमदार नरेंद्र मेहता यांनी सहकार क्षेत्रात नविन पिढीच्या सहभागाचे स्वागत करत सहकार भारतीच्या कार्याचे कौतुक केले. यानंतर या विविध सत्रामध्ये बैठकीत सदस्यता मोहीम, कार्यकर्ता अभ्यास वर्ग, आगामी कार्यक्रम नियोजन, सहकारी संस्था आणि बँकांच्या अडचणी, शासनाच्या नविन धोरणांचा आढावा, डिजिटल सहकाराच्या दिशेने पावले. युवकांना सहकार क्षेत्रात आकर्षित करण्याच्या योजना इ. मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. यावर्षी एक लाख सदस्यता करण्याचा संकल्प करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्रीय प्रचार सुमंत आमशेकर यांचे “संघ शताब्दी व पंच परिवर्तन” या विषयावर सत्र झाले. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष दत्ताराम चाळके, प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, आर.बी.आय संचालक आणि सहकार भारतीचे संस्थापक सदस्य सतीश मराठे, सहकार भारतीचे राष्ट्रीय मंत्री गजेन्द्र गौतम, प्रदेश संघटन प्रमुख शरद जाधव तसेच राज्यभरातील विभागीय व जिल्हास्तरावरील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध जिल्ह्यांतून आलेल्या प्रतिनिधींनी आपले अनुभव, सूचना मांडल्या.