सांगलीतील श्रीराम भक्ती उत्सवाची भजनाने सांगता

सांगलीकरांना आठ दिवस श्रीराम दर्शनाची पृथ्वीराज पाटील व डॉ. पतंगराव कदम फौंडेशननी दिली ऐतिहासिक संधी.

सांगली प्रतिनिधी :- पृथ्वीराज पाटील व डॉ. पतंगराव कदम फौंडेशननी सांगलीत श्रीराम मंदिराची हुबेहुब नेत्रदीपक प्रतिकृती उभी केली. सांगली आणि आसपासच्या गावातील जनसागर दर्शनासाठी लोटला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन दर्शन घेतले. आठ दिवस श्रीराम किर्तन, भजन,गीतरामायण, गायन, व्याख्यान, महाआरती व लेसरच्या माध्यमातून श्रीराम दर्शनाने सांगलीकर तृप्त झाले. खास भक्तांच्या आग्रहा खातर दि.२९ जानेवारी रोजीही एक दिवस दर्शनासाठी मंदीर खुले ठेवण्यात आले. तुंग येथील ह.भ. प. जयपाल बिरनाळे माऊली यांच्या हनुमान भजनी मंडळाच्या भजनानंतर आरती झाली आणि श्रीराम भक्ती उत्सवाची सांगता झाली. यावेळी या भक्ती उत्सवात सहकार्य केलेल्या सर्वांचे पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘सर्वांनाच यावेळी अयोध्येला जाता येईलच असे नाही म्हणून आम्ही सांगलीतच श्रीरामांच्या अयोध्येतील मंदिराची प्रतिकृती उभी करण्याचा संकल्प सोडला. पृथ्वीराज पाटील फौंडेशन, डॉ. पतंगराव कदम फौंडेशन आणि गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या सहकार्याने हा संकल्प पूर्ण करु शकलो. महापालिका, पोलिस खाते,वीज वितरण कंपनी देणगीदार यांचे उत्कृष्ट सहकार्य लाभले म्हणून हा उपक्रम यशस्वी झाला असे पृथ्वीराज पाटील म्हणाले. सांगलीकरांनी दर्शनासाठी केलेल्या गर्दीने आम्ही भारावून गेल्याचा त्यांनी खास उल्लेख करुन तमाम सांगलीकरांचे आभार मानले.