सांगली जिल्हा बँकेकडून वीराचार्य पतसंस्था उत्कृष्ट पतसंस्था पुरस्काराने सन्मानीत

सांगली :- सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक व स्व. गुलाबराव पाटील प्रतिष्ठान सांगली यांच्या वतीने सहकार तपस्वी स्व. गुलाबराव पाटील यांचे नांवे पतसंस्थांसाठी दिला जाणारा पहिला वहिला पुरस्कार सांगली येथील वीराचार्य पतसंस्थेस प्राप्त झाला. या प्रतिष्ठानच्यावतीने प्रतिवर्षी सांगली जिल्ह्यामध्ये विकास सोसायट्या, सोसायटी सचिव इत्यादीनां पुरस्कार देवून सन्मानीत करणेत येते. सहकार चळवळ समृद्ध करण्यासाठी सातत्याने योगदान देत कार्यरत असलेल्या पतसंस्थांना यावर्षापासूनच पुरस्कार देण्याची योजना केली गेली आणि प्रथमतःच पतसंस्थांच्या चळवळीकरीता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वीराचार्य पतसंस्था सांगलीस संपन्न झालेल्या संस्मरणीय अशा समारंभामध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार जयंतराव पाटील यांनी पतसंस्थांच्या माध्यमातून तसेच सहकारी चळवळीमुळे सर्वसामान्यांची प्रगती साधणे सुलभ झालेले आहे. आपला जिल्हा हा सहकार पंढरी म्हणून ओळखला जातो आणि अशा सहकार पंढरीमध्ये सहकाराची जपणूक करण्यासाठी सेवा सोसायटी, पतसंस्था तसेच गृहनिर्माण संस्था, पाणीपुरवठा संस्था या संस्था सहकाराच्या तत्त्वावर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करीत आहेत असे गौरवोद्‌गार त्यांनी काढले. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक मुख्यालय मध्ये झालेल्या सोहळ्यामध्ये आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष मानसिंगराव नाईक तसेच श्री.अजितराव घोरपडे, पृथ्वीराज पाटील तसेच वैभव शिंदे, बाळासाहेब होनमोरे, ऋतुराज पाटील या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संस्थेचे चेअरमन मोहन नवले, व्हाईस चेअरमन जे. जे पाटील यांनी व सर्व संचालक यांचेसह व्यवस्थापक शितल मसुटगे, सर्व अधिकारी वर्गाने हा पुरस्कार स्वीकारला. सहकारासाठी आपले सर्वस्व अर्पण केलेल्या सहकार तपस्वी स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या नावाचा उत्कृष्ट नागरी सहकारी पतसंस्था पुरस्कार संस्थेस प्राप्त झाल्याने वीराचार्य व्यवस्थापनावर पसंतीची मोहोर उमटविलेची भावना चेअरमन मोहन नवले यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे संस्थेची वाटचाल निरंतर प्रगती पथावर असल्याचे त्यांनी सांगितले.