सहकार भारतीचा स्व. अण्णा गोडबोले स्मृती पुरस्कार आ. प्रकाश आवाडे यांना प्रदान.

शिर्डी – सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने देण्यात येणारा, मानाचा स्व. म. ह. तथा अण्णा गोडबोले स्मृती पुरस्कार माजी मंत्री, आमदार प्रकाश आवाडे यांना शनिवार दि.21 सप्टेंबर रोजी शिर्डी येथे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सहकार भारती तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. तसेच यावेळी सहकार महर्षी या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक भाषणात राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी यांनी, ज्यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो त्या सहकार तपस्वी स्व.अण्णा गोडबोले यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. पुरस्कारप्राप्त आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, की सहकार भारतीने मला पुरस्कार दिला. हे मी माझे भाग्य समजतो. या पुरस्कारासाठी माझी निवड केली याबदल त्यांनी आभार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी स्व.अण्णा गोडबोले यांच्या समवेत सहकार भारतीचे कार्य केलेल्या आठवणी सांगितल्या, तसेच स्व.अण्णा गोडबोले यांचे सांगली अर्बन बँकेची स्थापना तसेच राज्यातील अनेक सहकारी बँकांच्या स्थापनेत असलेले योगदान विषद केले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार आशुतोष काळे, सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.उदय जोशी, राष्ट्रीय संगठन मंत्री संजय पाचपोर, रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, नूतन प्रदेश अध्यक्ष दत्ताराम चाळके, माजी प्रदेश अध्यक्षा शशीताई अहिरे, प्रदेश संघटन प्रमुख शरद जाधव, प्रदेश कोषाध्यक्ष आणि सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, सहकार सुगंधचे भालचंद्र कुलकर्णी, स्व.अण्णासाहेब गोडबोले यांचे नातू श्री.चेतन लागू, टी.जे.एस.बी चे अध्यक्ष शरद गांगल, जनता सहकारी बँक पुणेचे अभय माटे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, रविकाका बोरावके, अभिनाथ शिंदे आदी उपस्थित होते. सूत्र संचालन प्रदेश संपर्क प्रमुख संजय परमणे यांनी केले.