विवेकानंद नागरी सहकारी प्रत्यय संस्थेच्याअध्यक्षपदी विवेक जुगादे यांची फेरनिवड
उपाध्यक्षपदी महेश अंधारे.

नागपूर :- सहकार क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या विवेकानंद नागरी सहकारी प्रत्यय संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच अविरोध पार पडली. संस्थेच्या अध्यक्षपदी विवेक जुगादे यांची तर उपाध्यक्षपदी महेश अंधारे यांची अविरोध निवड करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी व निर्वाचन अधिकारी सौ. धनश्री खंडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक अविरोध पार पडली. संस्थेचे ज्येष्ठ संचालक सुधीर दप्तरी यांनी विवेक जुगादे यांच्या अध्यक्षपदासाठीच्या नावाचा प्रस्ताव सभेसमोर ठेवला व संस्थेच्या संचालिका डॉ.सौ राधिका मुरकुटे यांनी या प्रस्तावास अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी श्रीकांत आगलावे सूचक तर विवेक बापट अनुमोदक होते. सर्व संचालकांनी या नावांना पाठींबा दर्शवत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची ही निवडणूक अविरोध झाल्याची घोषणा निर्वाचन अधिकारी यांनी केली. याप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष विवेक जुगादे यांनी निर्वाचन अधिकारी व सर्व संचालकांचे आभार व्यक्त करत त्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विवेक जुगादे हे सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेशाचे महामंत्री असून सहकार क्षेत्राचा त्यांचा अनुभव आहे. अनेक वर्षांपासून ते पत्रकारितेमध्ये कार्यरत असून त्यांची मंगलम् मास मिडीया ही स्वतःची जाहिरात कंपनी आहे. महेश अंधारे हे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून रोटरी क्लब दक्षिण पूर्वचे अध्यक्ष आहेत. नव्या संचालक मंडळामध्ये ज्येष्ठ संचालक सुधीर दप्तरी, ईश्वर परचाकी, श्रीकांत आगलावे, कल्याण दिवाण, मधु गौर यांच्यासह नव्याने समावेश झालेले विवेक बापट, विवेक धाक्रस, डॉ राधिका मुरकुटे, माधुरी इंदूरकर, दीपक बारड, राहूल वेलंकीवार यांचा समावेश आहे. सुमारे 53 वर्षांची दमदार वाटचाल असलेल्या विवेकानंद नागरी सहकारी प्रत्यय संस्थेची वार्षिक उलाढाल 135 कोटींची अधिक असून संस्थेला स्थापनेपासूनच सतत ऑडिट वर्ग “अ“ प्राप्त झाला आहे. संस्थेचे खेळते भांडवल 110 कोटींहून अधिक असून संस्थेला यंदा 1.5 कोटीहून अधिक नफा प्राप्त झाला आहे. संस्था सर्व आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. यूपीआय, क्यूआर कोड, मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरबसल्या बँकिंग व्यवहार करण्याची सुविधा संस्थेद्वारे ग्राहकांना दिली जाते. संस्थेचे सर्व सभासद ग्राहक व हितचिंतकांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल नव्या संचालक मंडळाने सर्वांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.