राजर्षि शाहू महाराज कृषी महाविद्यालयातर्फे दंडोबा येथे वृक्ष लागवड आणि प्लॅस्टिक निर्मूलन कार्यक्रम

सांगली प्रतिनिधी :- डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सांगली येथील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत दि.30 ऑगस्ट रोजी वृक्ष संगोपन तसेच स्वच्छता मोहीम राबविली. वन खात्याच्या दोन हेक्टर वर केलेल्या वृक्ष लागवडीस संरक्षण, खत व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन, रोपाचे संगोपन करण्याबाबत प्रतिज्ञा घेतली. वन महोत्सव २०२४-२५ अंतर्गत हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी वनपाल (दंडोबा) बी.एल. कोळी, वनरक्षक (हरोली) अमीर काखतीकर, त्याचप्रमाणे वनसेवक बाबू खामकर, विठ्ठल पाटील, दिलीप जाधव उपस्थित होते. बी.एल कोळी ह्यांनी मुलांशी वृक्ष लागवड व संगोपन ह्या विषयावर संवाद साधला तसेच प्रात्यक्षिक करून वृक्ष लागवड व संगोपनाचा विचार मुलांच्या मनात रुजवला. वृक्ष संगोपनाचा निर्धार करण्याची प्रतिज्ञा त्यांनी विद्यार्थ्यांकडून घेतली व ज्या प्रमाणे आपण कॉलेजवर किंवा कॉलेजच्या परिसरात किंवा सामाजिक ठिकाणी वृक्ष लागवड करतो ती फक्त वृक्ष लागवड न करता त्याची संगोपनाची जबाबदारी घेतली पाहिजे याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शंकराच्या मंदिराजवळील परिसरात स्वच्छता तसेच भाविकांना वन्य जीवनाबाबत व प्लास्टिक विरहित निसर्गाचे संवर्धन करण्याचे महत्त्व सांगितले . मंदिरात सहली साठी आलेल्या शालेय मुलांना प्लास्टिक विरहित जीवनाचा संदेश देत असताना आम्हीही शाळेमध्ये जाताना कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक वापरणार नाही असे मुलांनी सांगितल्यामुळे कृषी महाविद्यालयातील एन. एस. एस. च्या मुलांनी केलेल्या कामाची पोचपावती मुलांना मिळाली. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. कुलभूषण पाटील ह्यांनी केले तर कार्यक्रम अधिकारी प्रा. किशोर चंदुरे होते. कार्यक्रमास डेक्कन एज्युकेशन सोसायटी सांगलीचे अध्यक्ष डॉ. विश्राम लोमटे व सचिन खेडकर तसेच महाविद्यालाय च्या प्रभारी प्राचार्य डॉ.अर्चना शिंदे व उपप्राचार्य अमित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. गौरी नाईक यांनी आभार मानले.