पटवर्धन हायस्कूलच्या “आम्ही १९९२-९३” चे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

सांगली :- हि.हा.राजा चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल, राजवाडा सांगली येथील सन १९९२-९३ बॅचचे स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात संपन्न झाले या स्नेहसंमेलनासाठी पुणे,नाशिक, कोल्हापूर, सोलापूर,बारामती,बेंगलोर, हैद्राबाद येथून १९९२-९३ बॅचचे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व प्रार्थना म्हणून झाली. उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींनी यांनी शाळेतील वर्गात बसून जुन्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर शाळेच्या स्व. डॉ. वसंतरावदादा पाटील सभागृह येथे मुख्य कार्यक्रम झाला. यावेळी स्वागत व प्रास्ताविक माजी विद्यार्थी संदीप कुलकर्णी यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले “३२ वर्षानंतर एवढ्या चांगल्या संख्येने माजी शिक्षक आणि माजी विद्यार्थी यांचे एकत्रिकरण घडवून आणले बद्दल नियोजन समितीचे तसेच नोकरी व्यवसाय निमित्त इतर ठिकाणी स्थायिक झालेले माजी विद्याथी – विद्यार्थिनी वेळ काढून या स्नेहमेळाव्यास उपस्थित राहिले बद्दल त्यांचेही आभार मानले. यानंतर शाळेचे माजी शिक्षक अनुक्रमे श्री. अ.भा.साळुंखे ,श्री. सुरेश हसबनीस, श्री. गणपती सपकाळ , श्री. उत्तम पोतदार , श्री. दिलीप हंकारे , श्रीमती श्रद्धा दिवाण तसेच विद्यमान मुख्याध्यापक केदार रसाळ , पर्यवेक्षक श्री.अमोल घोडके आदी उपस्थित शिक्षकांचा संयोजन समितीतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. यानंतर माजी विद्यार्थी अमर कदम यांच्या शालिनी बुक्स तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या “चक्रवर्ती” या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यानंतर माजी विद्यार्थिनी अस्मिता जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सेवानिवृत्त शिक्षक हंकारे सर यांनीही मनोगत व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री.रसाळ सर यांनी या स्नेहमेळाव्याचे नेटके संयोजन केल्याबद्दल कौतुक केले. ते म्हणाले आज सर्व माजी विद्यार्थी आणि विदुयार्थी यांना ३२ वर्षानंतर शाळेत एकत्र आणून एक चांगला उपक्रम केला आहे. यानंतर विविध गुणदर्शन आणि भोजन याचे आयोजन करण्यात आले होते. सूत्र संचालन राजेंद्र बेलवलकर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन रणजीत राऊत, सुनील दीक्षित, प्रसन्न शहा, अजय काळे, प्रीती सदलगे, मनीषा जोशी, सुप्रिया लिमयें यांनी केले. मनीषा जोशी यांनी आभार मानले.