दिनदर्शिकेच्या माध्यमातून रा. स्व. संघाचे विचार घरोघरी पोहोचविणे स्तुत्य – रवींद्र वंजारवाडकर

उद्यम सहकारी बँकेच्या २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

पुणे :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात उद्यम विकास सहकारी बँक , पुणे ने “रा.स्व.संघाबद्दल” माहिती देणारी दिनदर्शिका काढली आणि ह्या माध्यमातून संघ विचार घरोघरी पोहोचविण्याचा संकल्प केला हे स्तुत्य असल्याचे गौरवोदगार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्रजी वंजारवाडकर यांनी काढले. यावेळी रा.स्व.संघाचे पुणे महानगर कार्यवाह सचिनजी भोसले, बँकेचे अध्यक्ष सीए. दिनेश गांधी, उपाध्यक्षा सौ.लीनाताई अनास्कर, माजी अध्यक्ष व संचालक संदीपजी खर्डेकर, बँकेचे संचालक सर्वश्री सीए अभय शास्त्री, राजाभाऊ पाटील, शैलेश टिळक , मनोज नायर व जयंत काकतकर उपस्थित होते. दिनदर्शिकेच्या मुखपृष्ठावर संघाची प्रार्थना तिच्या अर्थासहीत व आतील पानांवर आजवरच्या संघाच्या सहा सरसंघचालकांची छायाचित्रे व त्यांची माहिती तर अन्य पानांवर विश्व हिंदू परिषद, राष्ट्रसेविका समिती, सहकार भारती, वनवासी कल्याण आश्रम व आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदू संघटनाचे कार्य करणाऱ्या हिंदू स्वयंसेवक संघ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख संघटनांची माहिती दिली असल्याचे बँकेचे अध्यक्ष सीए दिनेश गांधी व संचालक संदीप खर्डेकर यांनी सांगितले. उद्यम विकास सहकारी बँकेच्या संचालक व कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार हे प्रेरणास्रोत असून आम्ही सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सचोटीने व ग्राहकोन्मुख दृष्टिकोनातून बँकेचा व्यवसाय करण्यावर भर देतो असे बँकेचे अध्यक्ष सीए.दिनेश गांधी म्हणाले.